पुण्यात सिंहगड रस्त्यावर दोन स्कूल बसची धडक; सर्व विद्यार्थी सुखरूप, मोठी दुर्घटना टळली
पुणे: सिंहगड रस्त्यावर एकाच शाळेच्या दोन स्कूल बसची समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली. अपघाताचा आवाज मोठा असल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सुदैवाने दोन्ही बसमधील सर्व विद्यार्थी आणि कर्मचारी सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
अपघातानंतर सिंहगड रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघातग्रस्त बस बाजूला करून रस्ता मोकळा करण्यात आला, त्यामुळे काही वेळानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.
या घटनेमुळे पालकांमध्ये काही काळ चिंता निर्माण झाली होती. मात्र सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पालकांसह प्रशासनानेही सुटकेचा श्वास सोडला. या अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी









