गरजू, पीडित, दुर्बल व वंचित विद्यार्थ्यांसाठी ‘वुई टुगेदर फाउंडेशन’चा मदतीचा हात


​गरजू, पीडित, दुर्बल व वंचित विद्यार्थ्यांसाठी ‘वुई टुगेदर फाउंडेशन’चा मदतीचा हात

चिंचवड येथे आर्थिक सहाय्य निधी वाटप आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

​चिंचवड: समाजातील दुर्बल, गरजू, पीडित आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी ‘वुई टुगेदर फाउंडेशन’च्या वतीने आर्थिक सहाय्यता निधी वाटप आणि दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असा दुहेरी सोहळा चिंचवड येथे उत्साहात पार पडला.
​या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे उपस्थित होते. तर, राष्ट्रपती सन्मानित प्राध्यापिका शिल्पागौरी गणपुले या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या आजवरच्या कार्याचा आणि भविष्यातील शैक्षणिक प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला.
​…संस्थेचे कार्य अत्यंत स्तुत्य: महापौर रवी लांडगे
​विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना महापौर रवी लांडगे म्हणाले, “वुई टुगेदर फाउंडेशन समाजात अत्यंत मोलाचे आणि स्तुत्य कार्य करत आहे. आजचा हा कार्यक्रम अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीचा असून, गरजू विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची ही वृत्ती कौतुकास्पद आहे. संस्थेने हे सेवाकार्य असेच पुढे सुरू ठेवावे, यासाठी माझ्या सदैव शुभेच्छा आहेत.”
​अभ्यासाची योग्य दिशा ओळखणे गरजेचे: प्रा. शिल्पागौरी गणपुले
​राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त प्राध्यापिका शिल्पागौरी गणपुले यांनी पालक आणि विद्यार्थ्यांना सद्यस्थितीवर आधारित अत्यंत प्रभावी मार्गदर्शन केले. त्या म्हणल्या की, विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करून अभ्यासाची योग्य पद्धत अवलंबली पाहिजे. पालकांनीही बदलत्या काळाप्रमाणे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची पुढची दिशा ओळखून त्यांना पाठबळ दिले पाहिजे.
​आर्थिक मदतीने पालकांचे डोळे पाणावले…
​संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरातून निवडलेल्या गरजू विद्यार्थ्यांना जेव्हा शैक्षणिक अर्थसहाय्य सुपूर्द करण्यात आले, तेव्हा अनेक पालक आणि विद्यार्थी अत्यंत भावुक झाले होते. “आमच्या शैक्षणिक खर्चाचा काही प्रमाणात का होईना भार या संस्थेने उचलला, हे आमच्यासाठी खूप मोठे आहे. संस्थेचे हे उपकार आम्ही आयुष्यात कधीही विसरणार नाही,” अशा भावना अनेक पालकांनी कृतज्ञतापूर्वक व्यक्त केल्या.
​कार्यक्रम यशस्वीतेसाठी टीम ‘वुई टुगेदर’चे परिश्रम
​हा कौतुकास्पद उपक्रम यशस्वी करण्यासाठी वुई टुगेदर फाउंडेशन अध्यक्ष मधुकर बच्चे, फाउंडेशनचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, सचिव जयंत कुलकर्णी, सहसचिव मंगला डोळे-सपकाळे, खजिनदार दिलीप चक्रे, सल्लागार रवींद्र सागडे, खुशाल दुसाने, सलीम सय्यद, अजित कुलथे, दारासिंह मन्हास, सौरभ शिंदे, श्रीनिवास जोशी, शंकर कुलकर्णी, उल्हास दाते, झाकीर सय्यद, विलास गटने, के. रंगराव, अरविंद पाटील, विलास जगताप, बाळासाहेब जगताप, सदाशिव गुरव, दिलीप पेटकर, अर्जुन पाटोळे, जावेद शेख, अनिल शिंदे, धनंजय मांडके, जितेंद्र निखळ, रोहिणी बच्चे, अभिजीत पवार, सोनाली डावरे, अवधूत कुलकर्णी, वासंती काळे, एम. के. शेख, अनिल पोरे, श्रावणी बच्चे, असावरी बच्चे आणि धनराज गवळी आदी सदस्यांनी हिरारीने पुढाकार घेतला.
​कार्यक्रमाचे नेटके आणि प्रभावी सूत्रसंचालन संस्थेच्या सहसचिव मंगला डोळे-सपकाळे यांनी केले, तर उपाध्यक्ष रवींद्र काळे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

पत्रकार उमेश कुलकर्णी


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!