खिद्रापूरकरांचा २७ जूनपासून गावबंद आंदोलनाचा इशारा:-


खिद्रापूरकरांचा २७ जूनपासून गावबंद आंदोलनाचा इशारा:-

जि. कोल्हापूर,ता.खिद्रापूर :दि. 25 जून :- श्री कोपेश्वर मंदिर परिसरातील घरांवर व बांधकामांवर अतिक्रमणाचा ठपका ठेवून दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेविरोधात खिद्रापूर येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून, २७ जूनपासून गावबंद आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामसभेत एकमताने घेण्यात आला आहे.

ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयानुसार, न्याय मिळेपर्यंत गाव बंद ठेवणे, पर्यटकांना प्रवेशबंदी करणे, श्री कोपेश्वर मंदिर बंद ठेवणे तसेच कोणतीही विकासकामे न करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

या संदर्भातील निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी कोल्हापूर, पुरातत्त्व विभाग, जिल्हा पोलीस प्रमुख तसेच स्थानिक आमदार आणि खासदारांना देण्यात आल्या आहेत.

खिद्रापूर ग्रामपंचायतीत झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी सांगितले की, येथील नागरिक अनेक पिढ्यांपासून या परिसरात वास्तव्यास असून त्यांच्या मालकी हक्काची कागदपत्रे, प्रॉपर्टी कार्ड आणि महसुली नोंदी उपलब्ध आहेत. तरीही काही घरांवर अतिक्रमणाचे आरोप करण्यात येत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेमुळे गावकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. याचिकाकर्त्याने ग्रामस्थांची बाजू न ऐकता न्यायालयीन प्रक्रिया सुरू केल्याचे सांगत, गावकऱ्यांच्या वतीने सक्षम आणि अनुभवी विधिज्ञ नेमून न्यायालयात बाजू मांडण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, मंदिर परिसरात पुरातत्त्व विभागाकडून सुरू असलेल्या उत्खनन आणि इतर बांधकामांबाबतही ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले. संरक्षण भिंतीलगत करण्यात आलेल्या खोदकामामुळे मंदिराच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्याचा दावा करत संबंधित कामांची चौकशी करून ती तातडीने थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे.

ग्रामस्थांनी सांगितले की, २००५, २००६, २०१९ आणि २०२१ मधील महापुरामुळे गावाचे मोठे नुकसान झाले होते. अनेकांची घरे पडल्याने नागरिकांनी नव्याने घरे बांधली. काही घरे शासनाच्या विविध योजनांमधून उभारण्यात आली असून काही घरे सलमान खान यांच्या सेवाभावी फाउंडेशनच्या माध्यमातून उभारण्यात आल्याचेही ग्रामस्थांनी नमूद केले.

शासनाने ग्रामस्थांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे.
9359280220.


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!