मीरा
भाईंदरमध्ये धक्कादायक घटना; पार्क केलेल्या कारमध्ये एअरबॅग उघडल्याने तरुणाचा मृत्यू
मीरा भाईंदर :
मीरा भाईंदर परिसरात पार्क केलेल्या कारमध्ये एअरबॅग उघडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपघाताच्या वेळी वाहन रस्त्यावर धावत नसून पार्क केलेले होते, त्यामुळे या घटनेमागील नेमके कारण काय, याचा शोध पोलीस आणि तांत्रिक पथक घेत आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित तरुण कारमध्ये असताना अचानक एअरबॅग सक्रिय झाली. या घटनेत त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला. सुरक्षेसाठी बसवण्यात आलेली एअरबॅगच मृत्यूचे कारण ठरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून वाहन ताब्यात घेतले असून तांत्रिक तपासणी सुरू केली आहे. एअरबॅग अचानक का उघडली, वाहनात कोणता तांत्रिक बिघाड होता का, किंवा इतर कोणते कारण होते, याचा तपास सुरू आहे.
मृत्यूचे नेमके कारण आणि या घटनेमागील वस्तुस्थिती फॉरेन्सिक व तांत्रिक तपास अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी






