मुंबईत धक्कादायक प्रकार! मोहरम मिरवणुकीत ‘पेन किलर’ म्हणून वाटल्या उंदीर मारण्याच्या गोळ्या; १४ हजार गोळ्या जप्त
मुंबई:
मुंबईतील भायखळा परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मोहरमच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरिकांना ‘पेन किलर’ (वेदनाशामक) गोळ्या असल्याचे सांगून चक्क उंदीर मारण्याचे औषध (गोळ्या) वाटण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला रंगेहात अटक केली आहे.
तरुणांची प्रकृती बिघडली, एक जण गंभीर
मिरवणुकीदरम्यान या गोळ्यांचे वाटप करण्यात आले होते. पेन किलर समजून या गोळ्यांचे सेवन केल्यामुळे काही तरुणांची प्रकृती अचानक बिघडली. त्यापैकी एका तरुणाची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
मोठी कारवाई: १४ हजार विषारी गोळ्या जप्त
या गंभीर घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी तातडीने पावले उचलत मुख्य आरोपीला रंगेहात अटक केली. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून तब्बल १४ हजार विषारी गोळ्या जप्त केल्या आहेत. हा प्रकार नेमक्या कोणत्या हेतूने करण्यात आला, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429





