चिंचवली येथील वनवासी कल्याण आश्रम निवासी विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वितरण
’युथ कौन्सिल नेरुळ’ व ‘गीत गजानन भजनी मंडळा’चा स्तुत्य उपक्रम; आर. डी. गायकवाड यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस समाजकार्याने साजरा
नवी मुंबई:
नेरुळ येथील ‘युथ कौन्सिल नेरुळ’ या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील चिंचवली येथील वनवासी कल्याण आश्रमातील निवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, रोजच्या वापराच्या वस्तू तसेच आश्रमासाठी अन्नधान्य आदींचे वितरण रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी करण्यात आले. या उपक्रमाला नेरुळ येथील गीत गजानन भजनी मंडळ, समाजसेवक आर. डी. गायकवाड, सिने कलावंत रवींद्र गुरव, प्रकाश वामनराव पवार आणि चंद्रकांत रामभाऊ राणे यांचा सक्रिय सहभाग लाभल्याने हा कार्यक्रम अधिक भरीव आणि भारदस्त झाला.
याप्रसंगी मंचावर गीत गजानन भजनी मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती अपर्णा दाबके, श्रीमती आशा बर्वे, डॉक्टर धनश्री शिंदे, आर. डी. गायकवाड, रवींद्र गुरव, रमेश सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते आश्रमातील ३९ विद्यार्थ्यांना विविध शालेय व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
आरोग्याचा धडा आणि भक्तीचा जागर
आश्रमातील मुलांच्या सुंदर स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी दंतचिकित्सक डॉ. धनश्री शिंदे यांनी प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांना दातांची योग्य निगा कशी राखावी, तोंडाचे आरोग्य कसे जपावे आणि निरोगी सवयी कशा अंगीकाराव्यात याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी मुलांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन केले.
श्रीमती अपर्णा दाबके यांनी मुलांशी संवाद साधत त्यांच्याकडून भक्ती गीते म्हणून घेतली, तर श्रीमती आशा बर्वे यांनी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. सिने अभिनेते रवींद्र गुरव यांनीही याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.
सेवाव्रतींचा सन्मान
वयाची ७५ वर्षे पूर्ण होत असताना आपला अमृत महोत्सवी वाढदिवस या आश्रमातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून साजरा करणारे समाजसेवक आर. डी. गायकवाड यांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला. याप्रसंगी त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यासोबतच, आश्रमासाठी अहोरात्र योगदान देणारे व्यवस्थापक दिलीप बरफ आणि ‘दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्थेतून’ वृत्तपत्र विद्या पदविका उत्तीर्ण झाल्याबद्दल पत्रकार भालचंद्र माने यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
३९ वर्षांची अविरत सेवा
गेली ३९ वर्षे आदिवासी कल्याण योजनांमध्ये कार्यरत असलेल्या ‘युथ कौन्सिल’ संस्थेच्या कार्याचा आढावा घेत, संपूर्ण कार्यक्रमाचे सुसूत्र संचालन मुख्य सचिव सुभाष हांडे देशमुख यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जी. आर. पाटील, दत्ताराम आंब्रे, दिलीप चिंचोळे, मच्छिंद्रनाथ बोरगे, गोपाळ शिंदे, रवींद्र कांबळे, एस. बी. सिंग, चंद्रसेन कांबळे, अशोकराव महाजन तसेच गीत गजानन भजन मंडळाच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429









