राष्ट्रीय डॉक्टर दिनी १,४०० डॉक्टरांना नियुक्ती; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची मोठी घोषणा


राष्ट्रीय डॉक्टर दिनी १,४०० डॉक्टरांना नियुक्ती; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची मोठी घोषणा
मुंबई :
राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे औचित्य साधून राज्य सरकार १ जुलै रोजी तब्बल १ हजार ४०० डॉक्टरांना नियुक्तीपत्रे देणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली. आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य विभागात ३ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार असून ही प्रक्रिया पुढील तीन आठवड्यांत पूर्ण केली जाईल. तसेच, ५ हजार विविध पदांच्या भरतीलाही मंजुरी देण्यात आली असून त्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या भरतीमुळे राज्यातील शासकीय आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
शासकीय रुग्णालयांच्या पायाभूत सुविधांबाबत बोलताना आबिटकर यांनी सांगितले की, राज्यातील जुन्या रुग्णालयांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी प्रत्येक जिल्ह्याला ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या निधीमुळे जिल्हा रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांतील सुविधांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, पशुसंवर्धन विभागातील पदभरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून तीही लवकरच पूर्ण केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. राज्यातील विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या भरतीमुळे सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
— पत्रकार उमेश कुलकर्णी
मो. 9822548429


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!