TET पेपरफुटी प्रकरणावरून NSUI चे आंदोलन; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या ताफ्यासमोर निदर्शने

मुंबई : TET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ NSUI ने राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला असून, प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या ताफ्यासमोर निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
NSUI च्या कार्यकर्त्यांनी आरोप केला की, TET पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाला असून, यासाठी सरकारने नैतिक जबाबदारी स्वीकारावी. आंदोलनादरम्यान “दादा भुसे राजीनामा द्या” अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी NSUI चे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके यांनी सांगितले की, “राज्यातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड करणाऱ्या घटनांबाबत सरकारने कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.”
दरम्यान, या आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. TET पेपरफुटी प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरणही तापले असून, विरोधकांकडून सरकारवर सातत्याने टीका करण्यात येत आहे.
प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे.









