पिंपरी-चिंचवडमध्ये उभारले जाणार देशातील पहिले आदिवासी कला-कौशल्य केंद्र; आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश

पिंपरी, दि. २३ : पिंपरी-चिंचवड शहरात आदिवासी आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी देशातील पहिले आदिवासी कला-कौशल्य-कारागिरी केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या केंद्रासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याबाबत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून, संबंधित प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे.
महसूल विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर आयोजित बैठकीत आमदार महेश लांडगे, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पिंपरी-चिंचवडच्या विकासाशी निगडित सात महत्त्वपूर्ण निर्णयांना तत्त्वतः मंजुरी देण्यात आली.
बैठकीत देशातील पहिले आदिवासी कला-कौशल्य-कारागिरी केंद्र उभारण्यासाठी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीने पुनर्प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्यास राज्य शासनाकडून मंजुरी दिली जाणार आहे. तसेच, प्राधिकरण मिळकतींची प्रॉपर्टी कार्ड प्रक्रिया पुढील सहा महिन्यांत पूर्ण करण्यासाठी जमाबंदी आयुक्त आणि महापालिकेला समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले.
मोशी येथे आयआयएम नागपूरची उपशाखा सुरू करण्यासाठी जागा हस्तांतरणाचे आदेश सात दिवसांत देण्यात येणार असून, भोसरी विधानसभा मतदारसंघातील तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयांसाठी कायमस्वरूपी इमारती उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. अप्पर तहसीलदार कार्यालयासाठी आवश्यक पदभरती व पदवाढीला मान्यता देण्यात आली आहे.
याशिवाय, बोपखेल, डुडूळगाव, चऱ्होली बुद्रुक आणि चौविसावाडी या गावांचा नगर भूमापन अधिकारी, पिंपरी-चिंचवड यांच्या कार्यक्षेत्रात समावेश करण्याचा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, अप्पर तहसीलदार पिंपरी-चिंचवड कार्यालयासाठी नवीन जागेचा प्रस्ताव १५ दिवसांत शासनाकडे सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
या निर्णयांमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये प्रशासकीय सुविधा, शिक्षण, कौशल्य विकास आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीला मोठी चालना मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषतः आदिवासी कला-कौशल्य-कारागिरी केंद्रामुळे आदिवासी आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.
प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे.









