जळगाव सुभाष चौकात घाणीचे साम्राज्य; नागरिक आणि व्यापारी त्रस्त, मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष.
सोमेश मुळे जळगाव: शहरातील मुख्य आणि गजबजलेला भाग असलेल्या सुभाष चौकात सध्या कचरा आणि घाणीचे मोठे ढीग साचले आहेत. यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, स्थानिक व्यापारी, पादचारी आणि ग्राहकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महानगरपालिका प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराविरुद्ध नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सुभाश चौक हा जळगाव शहराचे प्रमुख व्यापारी केंद्र मानला जातो. येथे दररोज हजारो लोकांची ये-जा असते. मात्र, मुख्य रस्त्यावरच कचऱ्याचे ढीग साचल्याने संपूर्ण परिसराला कचरकुंडीचे स्वरूप आले आहे. दुर्गंधीमुळे दुकानदारांना दिवसभर दुकानात बसणे असह्य झाले आहे, तर ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे व्यापारावरही याचा विपरीत परिणाम होत आहे.
सध्या असलेल्या उष्ण आणि दमट वातावरणामुळे या साचलेल्या कचऱ्यावर डास, माश्या आणि कीटकांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे परिसरात मलेरिया, डेंग्यू आणि पोटाचे विकार यांसारख्या साथीच्या आजारांची भीती निर्माण झाली आहे. कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने तो रस्त्यावर पसरत असून, येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांमुळे घाण अधिकच पसरत आहे.
स्थानिक नागरिकांनी आणि व्यापारी संघटनांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांकडे आणि महानगरपालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. परंतु, “आज करू, उद्या करू” या पलीकडे मनपाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या गप्पा मारणारे प्रशासन प्रत्यक्षात शहरातील मुख्य चौकातील स्वच्छतेकडेही लक्ष देत नसल्याने मनपाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
“आम्ही नियमित कर भरतो, मग आम्हाला मूलभूत सुविधांसाठीही आंदोलन करावे लागणार का?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे. महानगरपालिकेने या समस्येची गंभीर दखल घेऊन सुभाष चौकातील घाणीचे ढीग तात्काळ उचलावेत आणि या भागात नियमित स्वच्छतेची व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील व्यापाऱ्यांनी दिला आहे.




