जिल्हा परिषद मराठी शाळा, सोयगाव येथे जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न
सोयगाव/महेंद्र बेराड दि. ३० जून २०२६ : जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा, सोयगाव (पंचायत समिती बुलढाणा) येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविणे, गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देणे आणि नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याच्या उद्देशाने शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक मा. श्री. निलेशजी तांबे तसेच उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद बुलढाणा मा. श्री. अनिलजी देवकर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांचे “शाळेत पहिले पाऊल” हा उपक्रम, गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण तसेच वृक्षारोपण हे उपक्रम मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात पालक, शिक्षक आणि समाज यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक असून, जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःच्या कष्टांवर विश्वास ठेवत सातत्याने परिश्रम करण्याची प्रेरणा त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. आजच्या डिजिटल युगात आधुनिक ज्ञान आत्मसात करणे गरजेचे असले तरी मोबाईलचा अतिवापर टाळावा आणि पाल्य मोबाईलवर काय पाहतो याकडे पालकांनी विशेष लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मार्गदर्शनानंतर त्यांनी शाळेतील शौचालय सुविधा, संगणक प्रयोगशाळा, वाचनालय, मध्यान्ह भोजन योजना तसेच इतर शैक्षणिक सुविधांची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. वर्षा बुधवत, उपाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर किसन नेवरे, सरपंच सौ. गीताबाई पिंपळे, उपसरपंच श्री. रमेश तायडे, माजी सरपंच श्री. समाधान भाऊ बुधवत, श्री. शिवहरी मांटे, श्री. राजाराम पिंपळे, रामजी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. परमेश्वर नेवरे, पोलीस पाटील श्री. रंगनाथ बुधवत, शाहीर श्री. जगन्नाथ बुधवत, श्री. देविदास जाधव, श्री. गणेश बुधवत, धाड पोलीस ठाण्याचे API श्री. मोर साहेब, ग्रामसेवक श्री. दराखे सर, श्री. ईश्वर वाघ सर तसेच गावातील अनेक मान्यवर, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. रमेश इंगळे यांनी केले, तर सूत्रसंचालन श्री. गणेश पळसकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. नागोराव उबरहंडे, सौ. लता पालीवाल, श्री. संतोष चवंड, श्री. प्रमोद पडोळ तसेच सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.




