नागद येथून बेकायदेशीर वाळू वाहतूक; हायवासह २५ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त:-


नागद येथून बेकायदेशीर वाळू वाहतूक; हायवासह २५ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त:-

जि. छ.संभाजीनगर, ता. कन्नड:दी. 30 जून :-तालुक्यातील नागद येथून कन्नड शहरात विनापरवाना वाळू वाहतूक करणारा एक हायवा वाहन कन्नड शहर पोलिसांनी पकडून वाळूसह तब्बल २५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत कन्नड शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल नामदेव धोंडकर हे पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांच्या आदेशानुसार पोलीस नाईक मिर्जा बेग, पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे आणि मयूर वाळुंजकर यांच्यासह चाळीसगाव रोड परिसरात गस्त घालत होते. दरम्यान, गुप्त बातमीदारामार्फत हिवरखेडा रोडने वाळूने भरलेला हायवा कन्नड शहरात येत असल्याची माहिती मिळाली.

माहितीनुसार पोलिसांनी पिशोर नाका येथे सापळा रचला. काही वेळात पांढऱ्या रंगाचा टाटा कंपनीचा १० टायर हायवा (क्रमांक एमएच १४ एमएच ८९१४) येताना दिसला. पोलिसांनी वाहन थांबवून पंचासमक्ष तपासणी केली असता त्यामध्ये वाळू आढळून आली.

वाहन चालकाने आपले नाव रवींद्र गणेश राठोड (वय ३५, रा. चंदिकावाडी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) असे सांगितले. तसेच वाहन मालकाचे नाव रघुनंदन उर्फ भोला एकनाथ पाटील (रा. कोठली, ता. भडगाव, जि. जळगाव) असल्याचे सांगितले. मालकाच्या सांगण्यावरून विनापरवाना अवैधरित्या वाळू वाहतूक करत असल्याची कबुली चालकाने दिली.

या कारवाईत पोलिसांनी २५ लाख रुपये किंमतीचा हायवा आणि त्यामधील ४ ब्रास वाळू, प्रत्येकी १० हजार रुपये प्रमाणे ४० हजार रुपये किंमतीची वाळू असा एकूण २५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त वाहन कन्नड शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.

या प्रकरणी कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार नासेर पठाण आणि पोलीस कॉन्स्टेबल सतीश नलावडे पुढील तपास करत आहेत.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे
9349280220.


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!