पंचगंगेला वाचवण्यासाठी आता आरपारची लढाई:-
जि. कोल्हापूर, ता. कुरुंदवाड:दी. 30 जून :-पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आता निर्णायक लढा उभारला जाणार असून, या पार्श्वभूमीवर रविवार, दि. ५ जुलै २०२६ रोजी कुरुंदवाड येथे सर्वपक्षीय मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आंदोलन अंकुशचे संस्थापक अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कुरुंदवाड येथील टेनिस क्लब हॉलमध्ये आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. पंचगंगा नदीत कोणत्याही प्रकारचे प्रदूषित पाणी सोडू नये, या मागणीसाठी शिरोळ तालुक्यातील पंचगंगा काठावरील गावांना सोबत घेऊन आंदोलन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रोसेस उद्योगांमधून विनाप्रक्रिया सोडले जाणारे विषारी रासायनिक पाणी हे पंचगंगा नदीच्या प्रदूषणाला मोठ्या प्रमाणात कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला. आंदोलनाच्या दबावामुळे काही काळ हे प्रदूषित पाणी नदीत येणे थांबले होते आणि त्यामुळे पंचगंगा काही प्रमाणात स्वच्छ झाली होती. मात्र नदी कायमस्वरूपी प्रदूषणमुक्त करायची असेल तर हे रासायनिक पाणी पूर्णपणे रोखणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
२५ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी कोणतीही ठोस कृती करण्यात आली नाही, असा आरोप करत चुडमुंगे यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. प्रदूषण करणाऱ्या घटकांना प्रशासनाकडून अप्रत्यक्ष सहकार्य मिळत असल्याचे चित्र बैठकीत दिसून आले. त्यामुळे आता आरपारची लढाई उभारण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार-आमदारांना निमंत्रण
५ जुलै रोजी होणाऱ्या मेळाव्यास हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने, शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. तसेच तालुक्यातील प्रमुख नेते, कार्यकर्ते, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.




