“मी जे काही करतो ते फुलप्रूफ करतो”; सचिन अहिरांच्या पक्षप्रवेशानंतर एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
मुंबई : आमदार सचिन अहिर यांनी महायुतीतून उपसभापतीपदाचा अर्ज भरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, “मी जे काही करतो ते फुलप्रूफ करतो,” असा ठाम विश्वास व्यक्त केला.
शिंदे म्हणाले की, सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशामुळे मुंबई तसेच कामगार क्षेत्रात शिवसेनेची ताकद आणखी वाढेल. त्यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाचा पक्षाला निश्चितच फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडले. “लोक सोबत असतात तोपर्यंत चांगले म्हणतात आणि बाजूला गेले की लगेच बदलतात. सध्या ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट’ असा दुटप्पी कारभार सुरू आहे,” अशी बोचरी टीका त्यांनी केली.
तसेच, “राजकारणात आम्ही जे काही निर्णय घेतो, ते पूर्ण विचारांती आणि फुलप्रूफ पद्धतीनेच घेतो,” असे सांगत शिंदे यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
पत्रकार : उमेश कुलकर्णी
मो. 9822548429




