एनएचएमच्या १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याचा ऐतिहासिक निर्णय; सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार


एनएचएमच्या १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याचा ऐतिहासिक निर्णय; सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार

मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. सलग १० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ सेवा बजावलेल्या १५ हजार १० कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित (कायम) सेवेत सामावून घेण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला असून, यासंदर्भातील शासन निर्णय (GR) मंगळवारी जारी करण्यात आला आहे.

या निर्णयानुसार, पात्र ठरलेल्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या पदनिर्मिती व अंमलबजावणीसाठी वार्षिक १५३.६० कोटी रुपयांच्या खर्चास शासनाने मान्यता दिली आहे.

तसेच, नियमित करण्यात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यात येणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीला अखेर मंजुरी मिळाल्याने एनएचएममधील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबांनाही मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!