पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण थरार! भरधाव टेम्पोने २५ वाहनांना धडक दिली; वाहतूक पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न


पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण थरार! भरधाव टेम्पोने २५ वाहनांना धडक दिली; वाहतूक पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न

पुणे, ता. २ (मिळवलेल्या वृत्तानुसार) : पुणे-सोलापूर महामार्गावरील वानवडी ते रवी दर्शन चौकादरम्यान भरधाव टेम्पो चालकाने २९ जून रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास वाहतूक पोलिसांच्या अंगावर वाहन घालून पळून जाण्याचा थरारक प्रकार केला. या घटनेत २० ते २५ वाहनांना धडक बसून अनेक वाहनांचे नुकसान झाले, तर काही प्रवासी जखमी झाले. रागावलेल्या नागरिकांनी १५ नंबर चौकात टेम्पो अडवून चालकाला पकडले. हडपसर पोलिसांनी चालकाला अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलिसांनी भरधाव वेगात येणाऱ्या इसुझु (आयशर) टेम्पोला थांबण्याचा इशारा दिला होता. मात्र, कारवाईच्या भीतीने चालकाने वाहन न थांबवता पोलिसांच्या अंगावर धडकवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पळून जाताना त्याने सुसाट वेगात वाहन चालवत रस्त्यावरील दुभाजक तोडले आणि अक्षरशः २० ते २५ वाहनांना धडक दिली. या धडकेत अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले.
या घटनेत काही प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचा संशय चालकावर व्यक्त होत आहे. ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकारात पोलिसांचे कर्तव्यात अडथळा आणणे, वाहनाने चिरडण्याचा प्रयत्न करणे, तसेच बेदरकार वाहन चालवून सार्वजनिक जीविताला धोका निर्माण करणे यांसारखे गंभीर आरोप चालकावर करण्यात आले आहेत. पोलिसांनी चालकाला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे पुणे-सोलापूर महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. नागरिकांनी चालकाला पकडल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणातील पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!