संघर्षातून यशाची भरारी; बारावीत 85 टक्के गुण मिळवत MPSC-UPSC चे स्वप्न उराशी बाळगणारी ऋतुजा आरणे
पिंपरी : आर्थिक अडचणी, मोठ्या कुटुंबाची जबाबदारी आणि प्रतिकूल परिस्थितीशी सातत्याने संघर्ष करत शिक्षणाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या ऋतुजा आरणे हिची यशोगाथा आज अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. परिस्थितीने वारंवार परीक्षा घेतली, मात्र जिद्द, चिकाटी आणि आई-वडिलांच्या त्यागाच्या बळावर तिने आपली स्वप्ने जिवंत ठेवली आहेत.
ऋतुजाचा जन्म आणि संगोपन एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. तिच्या कुटुंबात आई-वडील, चार बहिणी आणि एक भाऊ असा मोठा परिवार आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी वडील पोपट आरणे यांनी दिवसरात्र कष्ट घेतले, तर आई रेखा आरणे यांनी संसाराची जबाबदारी सांभाळत मुलांच्या शिक्षणात कोणतीही तडजोड होऊ दिली नाही. आर्थिक संकटे अनेकदा समोर उभी राहिली, तरी मुलांनी शिकून स्वतःच्या पायावर उभे राहावे, हेच त्यांच्या पालकांचे ध्येय राहिले.
ऋतुजाचे प्राथमिक शिक्षण पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बालवाडीतून सुरू झाले. त्यानंतर विविध शाळांमध्ये शिक्षण घेत तिने बारावीच्या परीक्षेत 85 टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. शिक्षणाबरोबरच चित्रकला, सुंदर हस्ताक्षर, शिवणकाम आणि इतर कौशल्यांमध्येही तिने प्राविण्य मिळवले. घरातील जबाबदाऱ्या पार पाडत आणि अनेक अडथळ्यांवर मात करत तिने शिक्षणाची वाट सोडली नाही.
पालकांच्या त्यागाची जाणीव मनात ठेवून ऋतुजाने प्रत्येक संधीचे सोने केले. तिच्या मेहनतीचा आणि सकारात्मक दृष्टिकोनाचा प्रभाव तिच्या भावंडांवरही पडला असून त्यांनीही शिक्षणाच्या वाटेवर यशस्वी पावले टाकली आहेत.
आज ऋतुजा महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनण्याच्या ध्येयासाठी परिश्रम घेत आहे. आपल्या आई-वडिलांच्या कष्टांचे चीज करणे आणि समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणारी अधिकारी बनणे, हेच तिचे स्वप्न आहे. संघर्ष, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर बारावीत 85 टक्के गुण मिळवणाऱ्या ऋतुजा आरणेची ही यशोगाथा अनेक युवक-युवतींसाठी प्रेरणादायी ठरत आहे…
प्रतिनिधी अभिजित कुलकर्णी निगडी






