कांचन नगर आसोदा रोड खड्डेमय; स्थानिक नगरसेवक व प्रशासनाची पायमल्ली!..
जळगाव: शहरातील कांचन नगर ते आसोदा रोड या अत्यंत गजबजलेल्या मार्गाची गेल्या अनेक महिन्यांपासून दुरवस्था झाली असून, संपूर्ण रस्ता खड्ड्यांच्या साम्राज्यात हरवला आहे. या गंभीर समस्येमुळे स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांना दररोज मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. अत्यंत संतापजनक बाब म्हणजे, जळगाव महानगरपालिका प्रशासन आणि या भागाचे स्थानिक नगरसेवक दोघेही या समस्येकडे जाणीवपूर्वक पाठ फिरवत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
आसोदा रोड हा परिसरातील मुख्य संपर्क मार्ग असल्याने यावरून २४ तास वाहनांची ये-जा सुरू असते. रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार घसरून पडणे आणि वाहनांचे नुकसान होणे रोजचेच झाले आहे. खड्ड्यांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धूळ उडत असून, कांचन नगरमधील रहिवाशांना श्वसनाचे आजार जडले आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या आरोग्याला याचा सर्वाधिक फटका बसत आहे.
निवडणुकीच्या काळात मतदारांना चकाचक रस्त्यांची आश्वासने देणारे स्थानिक नगरसेवक आता या रस्त्यावरून जाताना डोळे झाकून घेत असल्याचा संताप रहिवासी व्यक्त करत आहेत. नागरिकांनी अनेकदा नगरसेवकांकडे धाव घेतली आणि महानगरपालिकेत खेटे घातले, मात्र प्रशासनाकडून केवळ पोकळ आश्वासनापलीकडे काहीही मिळालेले नाही. “आम्ही नियमितपणे घरपट्टी आणि पाणीपट्टी भरतो, मग आम्हाला मूलभूत सुविधेसाठी एवढा संघर्ष का करावा लागतो?” असा रोकडा सवाल स्थानिक जनता उपस्थित करत आहे.
आंदोलनाचा इशारा
महानगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या या संयुक्त उदासीनतेमुळे कांचन नगर आणि आसोदा रोड परिसरातील नागरिकांच्या संयमाचा बांध आता सुटत चालला आहे. जर या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून खड्डे बुजवण्यात आले नाहीत, तर पालिका प्रशासनाविरोधात आणि स्थानिक नगरसेवकांच्या घरासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.
प्रतिनिधी सोमेश मुळे






