खडकी वाहतूक पोलिसांची तत्परता; हरीश ब्रिजखाली पाण्यात अडकलेल्या चालकाचे प्राण वाचवले
पुणे : मुसळधार पावसामुळे हरीश ब्रिजखाली मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने एका चारचाकी चालकाने वाहन अंडरपासमध्ये नेले. काही क्षणांतच वाहन पाण्यात अडकले आणि चालकही त्यातच अडकून पडला.
घटनेची माहिती मिळताच खडकी वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी केंद्रे साहेब, पोलीस हवालदार कारले आणि पुकाळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. सर्वप्रथम त्यांनी वाहनातील चालकाला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर हायड्रा क्रेनच्या सहाय्याने पाण्यात अडकलेली चारचाकीही सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली.
वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून, चालकाचे प्राण वाचल्याने नागरिकांकडून खडकी वाहतूक पोलिसांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
दरम्यान, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अंडरपास, सखल भाग आणि पाणी साचलेल्या रस्त्यांवरून वाहन चालवताना विशेष खबरदारी घ्यावी, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि धोका पत्करून पाण्यातून वाहन नेण्याचे टाळावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429






