पुण्यात ब्राह्मण समाजासाठी मोफत वधू-वर मेळावा उत्साहात संपन्न; ३४७ उमेदवारांची नावनोंदणी
पुणे, दि. ६ जुलै:
अखिल भारतीय पेशवा संघटनेच्या वतीने सर्व शाखीय ब्राह्मण समाजासाठी आयोजित करण्यात आलेला १७ वा राज्यस्तरीय मोफत वधू-वर परिचय मेळावा उत्साहात पार पडला. कसबा पेठेतील याज्ञवल्क भवन येथे रविवारी (दि. ५ जुलै) सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात ऑनलाईन आणि प्रत्यक्ष अशा दोन्ही माध्यमांतून एकूण ३४७ वधू-वरांची यशस्वी नोंदणी झाली असून, मेळाव्यातच अनेकांची विवाहासाठी प्राथमिक बोलणी देखील सुरू झाली आहेत.
या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, नगरसेविका सौ. मंजुश्री खर्डेकर, हिंदू महासभेचे कार्यवाहक मनोज तारे, महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे प्रदेशाध्यक्ष मयुरेश अरगडे, प्रदेश कार्याध्यक्ष चैतन्य जोशी उपस्थित होते. तसेच अखिल भारतीय पेशवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन वाडे-पाटील, स्वागताध्यक्ष मोरेश्वर मार्डीकर आणि युवक आघाडी अध्यक्ष पार्थ वाडे-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मेळाव्याच्या सुरुवातीला संघटनेच्या वतीने सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
या राज्यस्तरीय मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व शाखीय ब्राह्मण समाजातील प्रथम वधू-वर, घटस्फोटीत, विधवा, विधूर आणि दिव्यांग उमेदवारांसाठी हा मेळावा पूर्णपणे मोफत आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यादरम्यान मोरेश्वर मार्डीकर यांनी प्रास्ताविक केले, तसेच उपस्थित पालकांना वधू-वरांच्या मोफत पत्रिका पाहून विवाह योग कधी आहे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी मनोज तारे, संदीप खर्डेकर, मंजुश्री खर्डेकर, मयुरेश अरगडे आणि सचिन वाडे-पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करत संघटनेच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.
अखिल भारतीय पेशवा संघटनेतर्फे कोणतेही शुल्क न घेता अशा मेळाव्यांचे आयोजन केले जाते. आगामी काळात संघटनेच्या वतीने आणखी ३ मोफत मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये १ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर, २ ऑगस्ट रोजी जालना आणि ८ ऑगस्ट रोजी पुणे येथे हे मेळावे होतील. समाजबांधवांना संघटनेच्या अधिकृत ॲप आणि वेबसाईटवरही मोफत नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष सचिन वाडे-पाटील यांनी दिली.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429






