मोशी कचरा डेपो येथे भूस्खलन; ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळला

पिंपरी-चिंचवड : अतिवृष्टीमुळे मोशी कचरा डेपो येथे मोठी दुर्घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे कचऱ्याच्या डोंगराचे भूस्खलन होऊन महानगरपालिकेच्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा मोठा ढिगारा कोसळला.
प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत दोन ते तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच आठ ते दहा कर्मचारी कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता असून, त्यांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
घटनास्थळी अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि संबंधित यंत्रणा दाखल झाल्या असून, ढिगारा हटवून अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जखमी कर्मचाऱ्यांना तातडीने जवळील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात येत आहे.
या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत असून, त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सर्वजण सहभागी आहेत. अतिवृष्टीमुळे घडलेल्या या दुर्दैवी घटनेत निष्पाप कर्मचाऱ्यांचा जीव गेल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
टीप : वरील मृतांचा आकडा आणि अडकलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ही प्राथमिक माहितीवर आधारित असून, अधिकृत प्रशासनाकडून अंतिम पुष्टी होणे बाकी आहे.
प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे




