मुंबईत बेस्ट बसचा भीषण अपघात; बस आणि कुंडीत अडकून एक जण गंभीर जखमी, ३ वाहनांचे नुकसान!
भांडुप (मुंबई):
मुंबईतील भांडुप येथील कोकण नगर परिसरात आज (८ जुलै) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास बेस्ट बसचा एक विचित्र आणि थरारक अपघात झाला. या अपघातात एक पादचारी गंभीर जखमी झाला असून, बसने तीन वाहनांना जोरदार धडक दिली आहे. अतुल अनंत पडवे (वय ४३) असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
ओशिवरा डेपोची ए-४२५/३२ (बस क्र. ४०४७) ही बस कोकण नगर परिसरातून जात असताना, चालकाला रस्त्यावरून उजवे वळण घेताना अंदाज आला नाही. वळण व्यवस्थित न घेता आल्यामुळे चालकाने बस मागे (रिव्हर्स) घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, याच वेळी बसच्या मागील भागाची जोरदार धडक रस्त्यावरून जाणाऱ्या अतुल पडवे यांना बसली. ही धडक इतकी मोठी होती की, पडवे हे बसचा मागील भाग आणि रस्त्याशेजारी असलेल्या एका मोठ्या झाडाच्या कुंडीमध्ये कशबश्या अडकले.
स्थानिकांची तत्परता, पण चालकाचा ताबा सुटला!
हा प्रकार पाहताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बसला पुढे ढकलून पडवे यांची सुटका केली. मात्र, या सर्व गोंधळात चालकाचा बसवरील ताबा पूर्णपणे सुटला. नियंत्रण सुटलेली बस पुढे जाऊन पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दोन दुचाकी आणि एका रिक्षाला धडकली. या धडकेत वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे
या भीषण अपघातात अतुल पडवे यांच्या दोन्ही मांडींना गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला आहे. बस वाहकाने (कंडक्टर) कोणताही वेळ न गमावता त्यांना तातडीने मुलुंड येथील अग्रवाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच बेस्टचे विशेष बस निरीक्षक आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या भांडुप पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या या अपघातामुळे परिसरात काही काळ प्रचंड गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
प्रतिनिधी सिंथिया कोरिया मुंबई






