चिकन आणि दही खाल्ल्यानंतर विषबाधा; पत्नीनंतर अवघ्या १० दिवसांत पतीचाही उपचारादरम्यान मृत्यू
नाशिक | प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील आखतवाडे येथे जेवणानंतर एका शेतकरी दाम्पत्याला विषबाधा झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेत पत्नीच्या मृत्यूनंतर अवघ्या दहा दिवसांत पतीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आखतवाडे येथील शेतकरी दाम्पत्याने २८ जून रोजी रात्रीच्या जेवणात चिकन खाल्ले. त्यानंतर त्यांनी दहीही सेवन केले. काही वेळातच ६८ वर्षीय द्वारकाबाई यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त होत असताना त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर त्यांचे पती शांताराम यांचीही प्रकृती गंभीर झाली होती. त्यांच्यावर मालेगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. पत्नीच्या निधनानंतर अवघ्या दहा दिवसांत पतीचाही मृत्यू झाल्याने या प्रकरणाबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
या घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चिकन, दही किंवा इतर कोणत्या कारणामुळे विषबाधा झाली, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. आरोग्य विभाग आणि पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत असून अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी
मो. : 9822548429







