गोखले कॉलेजसमोरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर शिवसेनेचा संताप; १५ ऑगस्टपर्यंत परिसर स्वच्छ करण्याचा इशारा:-


गोखले कॉलेजसमोरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर शिवसेनेचा संताप; १५ ऑगस्टपर्यंत परिसर स्वच्छ करण्याचा इशारा:-

जि. रायगड,ता.श्रीवर्धन:दी. 9 जुलै :-आराठी गावातील गोखले कॉलेजसमोरील मुख्य रस्त्याच्या कडेला गेल्या अनेक वर्षांपासून घरगुती कचरा टाकला जात असल्याने परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दुर्गंधी, डास-माशांचा वाढता प्रादुर्भाव आणि संसर्गजन्य आजारांचा धोका वाढल्यामुळे नागरिक, विद्यार्थी आणि प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

या गंभीर समस्येबाबत ग्रामपंचायत व पंचायत समितीकडे वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी तोडगा न निघाल्याने शिवसेना तालुकाप्रमुख ओंकार सदानंद शेलार, माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश कोलंबेकर आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी किशोर नागे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

यावेळी विस्तार अधिकारी किशोर नागे यांनी सांगितले की, गावात कचरा टाकण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध नसल्याने काही नागरिक या ठिकाणी कचरा टाकत आहेत. प्रशासनाकडून वेळोवेळी कचरा उचलून परिसराची स्वच्छता केली जाते आणि नागरिकांना सूचना दिल्या जातात. मात्र, यासाठी मोठा खर्च होत असून कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी गावाबाहेर कचरा व्यवस्थापनाची जागा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात तहसीलदार कार्यालयालाही पत्र पाठविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश कोलंबेकर यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करत गोखले कॉलेजसमोरील हा प्रश्न केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित नसून नागरिक व विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी निगडित असल्याचे सांगितले. १५ ऑगस्टपर्यंत संपूर्ण परिसर कचऱामुक्त करून स्वच्छता करण्यात यावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीने नागरिकांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे.
9359280220.


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!