मुंबईत दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश; अमूल-गोकुळच्या पिशव्यांत पाणी मिसळून विक्री, ४७० लिटर दूध जप्त
मुंबई | प्रतिनिधी
मुंबईमध्ये अमूल आणि गोकुळसारख्या नामांकित ब्रँडेड कंपन्यांच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या मोठ्या दूध भेसळ रॅकेटचा मुंबई गुन्हे शाखा कक्ष-१२ आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) यांनी संयुक्त कारवाईत पर्दाफाश केला आहे. ही कारवाई दहिसर (पूर्व) परिसरात करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमूल आणि गोकुळसारख्या नामांकित कंपन्यांच्या दूध पिशव्यांमधील मूळ दूध काढून त्यात अस्वच्छ पाणी मिसळत होते. त्यानंतर या पिशव्या पुन्हा सील करून बाजारात विक्रीसाठी पाठवल्या जात असल्याचे तपासात उघड झाले.
छाप्यामध्ये प्रशासनाने ४७० लिटर भेसळयुक्त दूध जप्त करून तात्काळ नष्ट केले. तसेच या कारवाईत सुमारे ३९,७५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला रंगेहात अटक केली असून, या भेसळ रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429







