जळगाव विमानतळ रस्त्यावर पहाटे भीषण अपघात; टमाट्यांनी भरलेली आयशर गाडी सिमेंट रॅलिंगला धडकून पलटी


जळगाव विमानतळ रस्त्यावर पहाटे भीषण अपघात; टमाट्यांनी भरलेली आयशर गाडी सिमेंट रॅलिंगला धडकून पलटी
सोमेश मुळे जळगाव:जळगाव विमानतळ रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. टमाट्याचे कॅरेट वाहून नेणारी एक आयशर मालवाहू गाडी रस्ता ओलांडत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने सिमेंटच्या रॅलिंगला धडकून थेट रस्त्यावर पलटी झाली. हा अपघात सकाळी ४:०० ते ४:३० वाजण्याच्या दरम्यान घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, टमाट्यांनी गच्च भरलेली आयशर गाडी विमानतळाच्या दिशेने जात होती. पहाटे साडेचारच्या सुमारास रस्ता क्रॉस करत असताना अचानक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि वाहन थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंट रॅलिंगवर जाऊन आदळले. धडक इतकी जोरदार होती की, आयशर गाडी रस्त्याच्या मधोमध उलटली.
रस्त्यावर टमाट्यांचा सडा, वाहतूक विस्कळीत
गाडी पलटी झाल्यामुळे आयशरमधील टमाट्यांचे शेकडो कॅरेट रस्त्यावर फेकले गेले. यामुळे संपूर्ण रस्त्यावर टमाट्यांचा सडा पडला असून मोठे नुकसान झाले आहे. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी होती, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. मात्र, या अपघातामुळे विमानतळ रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती.

पहाटेच्या वेळी महामार्गांवर किंवा प्रमुख रस्त्यांवर चालकांना येणारी डुलकी किंवा अंधारामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने अनेकदा असे अपघात घडतात. या घटनेतही चालक थकलेला असल्याने किंवा वळणावर अंदाज चुकल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावरील कॅरेट आणि अपघातग्रस्त वाहन बाजूला सारून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. या अपघातात चालक सुरक्षित आहे की जखमी, याबाबत अधिकृत माहिती मिळणे अद्याप बाकी आहे.


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!