बेकायदेशीर मुरूम उत्खननामुळे पाझर तलावाला धोका; तात्काळ कारवाईची मागणी:-


बेकायदेशीर मुरूम उत्खननामुळे पाझर तलावाला धोका; तात्काळ कारवाईची मागणी:-

जि. लातूर, ता. निलंगा :दी. 14 जुलै :-निलंगा तालुक्यातील मौजे नणंद येथील पाझर तलावालगत सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर मुरूम उत्खननामुळे गावाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

घाडगे नगर वस्तीच्या पश्चिमेस देवसाळे यांच्या शेतालगत असलेल्या पाझर तलावाच्या पाळूजवळ अवघ्या ५० फूट अंतरावर मागील महिनाभरापासून दोन पोकलेन आणि सुमारे २५ हायवा वाहनांच्या साहाय्याने मुरूम उत्खनन सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या संदर्भात जलसंधारण विभागाचे अधिकारी शेलार यांना दूरध्वनीद्वारे माहिती देण्यात आली असून त्यांनी तातडीने कारवाईचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले आहे. तलावाच्या पाळूला लागून उत्खनन होत असल्याने भविष्यात पाणीसाठा वाढल्यास पाळू खचून पाझर तलाव फुटण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अशी घटना घडल्यास घाडगे नगर वस्तीमध्ये पाणी शिरून जीवित व वित्तहानी होण्याचा धोका असल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे.

शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. अण्णासाहेब मिरगाळे यांनी जलसंधारण अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देऊन संबंधित ठेकेदाराविरुद्ध तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच बेकायदेशीर मुरूम उत्खनन थांबवून राज्य महामार्गाच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या मुरूमाची चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, प्रशासनाने त्वरित दखल न घेतल्यास शिवसेना शेतकरी सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे. 9359280220.


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!