शिंदेसेनेच्या महिला आघाडी उपजिल्हाप्रमुखाला अटक; भंगार व्यावसायिकाकडे २ लाखांच्या खंडणीचा आरोप
नवी मुंबई : नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी भंगार व्यावसायिकाकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख पूजा बनसोडे यांना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यावसायिकाकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. व्यावसायिकाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याला आणि तेथील एका कामगाराला मारहाण करण्यात आली तसेच शिवीगाळ व धमकावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पीडित व्यावसायिकाच्या तक्रारीवरून तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात खंडणी, मारहाण आणि धमकीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत पूजा बनसोडे यांना अटक केली.
या प्रकरणातील इतर चार आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या खंडणी प्रकरणामागील नेमके कारण आणि इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा पुढील तपास तुर्भे एमआयडीसी पोलीस करत आहेत.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429





