भारतात डेंग्यूच्या पहिल्या ‘क्यूडेंगा’ लशीला मंजुरी; DCGI कडून वापरासाठी हिरवा कंदील
नवी दिल्ली : देशातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतात प्रथमच डेंग्यू प्रतिबंधक लशीला अधिकृत मंजुरी मिळाली असून, ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) यांनी ताकेडा बायोफार्मास्युटिकल्स इंडियाच्या ‘क्यूडेंगा’ (Qdenga) या लशीला बाजारात वापरण्यास परवानगी दिली आहे.
‘क्यूडेंगा’ ही भारतात मंजुरी मिळालेली पहिली डेंग्यू प्रतिबंधक लस ठरली आहे. ही लस डेंग्यूच्या चारही प्रकारांपासून (सीरोटाइप्स) संरक्षण देण्यासाठी विकसित करण्यात आली असून, डेंग्यूचा संसर्ग आणि गंभीर गुंतागुंत कमी करण्यास मदत होणार आहे.
भारतीय कंपनीने जपानमधील ताकेडा कंपनीसोबत केलेल्या कराराअंतर्गत ही लस भारतात उपलब्ध करून दिली जाणार आहे. तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात वाढणाऱ्या डेंग्यूच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर या लशीच्या उपलब्धतेमुळे डेंग्यू प्रतिबंधाला मोठी चालना मिळणार आहे.
देशात लशीची उपलब्धता टप्प्याटप्प्याने सुरू होणार असून, आरोग्य क्षेत्रासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429






