NEET परीक्षा आणि विद्यार्थी आंदोलनावर ठाकरे बंधू आक्रमक; २६ जुलैला मुंबईत विद्यार्थ्यांच्या मोर्चाची घोषणा


NEET परीक्षा आणि विद्यार्थी आंदोलनावर ठाकरे बंधू आक्रमक; २६ जुलैला मुंबईत विद्यार्थ्यांच्या मोर्चाची घोषणा

मुंबई :देशभरात सुरू असलेल्या NEET परीक्षा आणि विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत येत्या २६ जुलै रोजी सकाळी १० वाजता मुंबईत विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा काढण्याची घोषणा त्यांनी केली.
राज ठाकरे यांनी सांगितले की, या मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा नसणार आहे. हा मोर्चा शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर असा काढण्यात येणार असून, सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत सुबुद्धी मिळावी, अशी प्रार्थना करण्यात येणार आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षालाही या मोर्चात सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी NEET परीक्षा आणि विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “हा विषय आता केवळ केंद्रीय शिक्षण मंत्र्यांपुरता राहिलेला नाही, तर थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचला आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे लक्ष द्यायला वेळ नाही, हा सत्तेचा माज आहे,” अशी टीका त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले, “NEET परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना किती त्रास सहन करावा लागतो, हे सरकारने समजून घ्यायला हवे. मी यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले होते की, आज शेतकरी आत्महत्या करत आहेत, उद्या विद्यार्थी करतील. दुर्दैवाने आज ती भीती खरी ठरताना दिसत आहे.”
विद्यार्थी आंदोलनाशी संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नसल्याचे सरन्यायाधीशांनी सांगितल्याच्या संदर्भातही त्यांनी टीका केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सर्व संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429


44
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!