नवी मुंबई: युथ कौन्सिलतर्फे वृक्षपूजन आणि वृक्षारोपणाने आषाढी एकादशी साजरी; महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार
नेरुळ (नवी मुंबई):
गेली ३९ वर्षे अखंडपणे वृक्षपूजन आणि वृक्षारोपण करून आषाढी एकादशी साजरी करणाऱ्या ‘युथ कौन्सिल, नेरुळ’ या सेवाभावी संस्थेच्या वतीने यंदाही ही परंपरा उत्साहात साजरी करण्यात आली. नेरुळ येथील संस्थेच्या ‘सावली रोपवाटिका प्रकल्पात’ २५ जुलै २०२६ रोजी नवी मुंबईच्या महापौर सौ. सुजाताताई पाटील यांच्या हस्ते वृक्षपूजन व वृक्षारोपण पार पडले. या उपक्रमात ‘गजानन महाराज भक्त मंडळ, वाशी’ यांचे विशेष सहकार्य लाभले.
याप्रसंगी बोलताना महापौर सुजाता पाटील यांनी दोन्ही संस्थांच्या निसर्गसंवर्धनाच्या कार्याचे कौतुक केले. “पंढरपूरची वारी करून परमेश्वराचे दर्शन घेण्याइतकेच महत्त्व चराचरात देव शोधून वृक्षलागवड व त्यांचे संवर्धन करण्याला आहे. अशा निसर्गप्रेमींना वृक्षरूपाने परमेश्वराचा आशीर्वाद नक्कीच मिळतो,” असे मत महापौरांनी व्यक्त केले.
पत्रकार राजेंद्र घरत यांनी आपल्या भाषणात केवळ फोटो काढण्यापुरते वृक्षारोपण करणाऱ्यांवर टिप्पणी करत, नवी मुंबई महानगरपालिका अस्तित्वात येण्यापूर्वीपासून झाडे लावून ती जगवणाऱ्या युथ कौन्सिलच्या सातत्यपूर्ण कामाची प्रशंसा केली. तसेच, महापालिका शाळेचे मुख्याध्यापक अशोक सोनवणे यांनी पालिकेने प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासोबतच आता पदवी शिक्षणाचीही सोय करावी, अशी मागणी महापौरांकडे केली.
गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार
या कार्यक्रमात यंदाच्या शालांत परीक्षेत पालिकेच्या शाळांमधून उज्ज्वल यश संपादन करणारे विद्यार्थी—अभीराम मनोज कुमार राऊत, कुमारी रिया राकेश कहार व कुमारी श्रावणी संदीप गालवे—यांचा महापौरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
तसेच, शारीरिक व्याधींवर मात करत शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात ठसा उमटवणारी ८ वीतील विद्यार्थिनी उल्का राजेश झगडे आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विकास साठे यांचाही गौरव करण्यात आला. याच सोहळ्यात संस्थेचे संस्थापक सदस्य विक्रम राम व जी. आर. पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या मंचावर मुख्याध्यापक अशोक सोनवणे, विकास साठे, नगरसेविका सौ. मीराताई पाटील, पत्रकार राजेंद्र घरत आणि गजानन महाराज भक्त मंडळाचे सचिव शिवाजीराव शिंदे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युथ कौन्सिल नेरुळचे मुख्य सचिव सुभाष हांडेदेशमुख यांनी केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी युथ कौन्सिल, गजानन महाराज भक्त मंडळ आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी





