देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त राजेंद्रजी श्रीवास्तव इंग्लिश स्कूलची भव्य पायी दिंडी


देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त राजेंद्रजी श्रीवास्तव इंग्लिश स्कूलची भव्य पायी दिंडी

वारकरी परंपरेचा संस्कार; विठ्ठल नामाच्या गजरात पारध परिसर भक्तिमय
पारध बु./ महेंद्र बेराड :
देवशयनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून येथील स्वर्गीय राजेंद्रजी श्रीवास्तव इंग्लिश स्कूल, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने भव्य पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले. या दिंडीत शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून टाकला.
दिंडीची सुरुवात शाळा परिसरातून झाली. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि ‘ज्ञानबा-तुकाराम’, ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ अशा नामघोषात दिंडी गावातील प्रसिद्ध श्री पराशर महाराज मंदिरापर्यंत नेण्यात आली. या वेळी विद्यार्थिनी प्राची फुसे व खुशी जाधव यांनी विठ्ठल-रुक्मिणीची आकर्षक वेशभूषा साकारून उपस्थितांची मने जिंकली.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सचिन लक्कस म्हणाले, “विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाबरोबरच अध्यात्माची जाणीव, आत्मशांती, श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकतेची भावना विकसित व्हावी, या उद्देशाने या दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.”
संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाचे पालक, ग्रामस्थ आणि सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.


44
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!