बोरसुतची लेक यामिनी खामकर हिचा आंतरराष्ट्रीय मंचावर डंका; यूकेमधील ‘वोमॅड फेस्टिव्हल’मध्ये गाजवले ढोल वादन


बोरसुतची लेक यामिनी खामकर हिचा आंतरराष्ट्रीय मंचावर डंका; यूकेमधील ‘वोमॅड फेस्टिव्हल’मध्ये गाजवले ढोल वादन

​संगमेश्वर:तालुक्यातील बोरसुत गावची कन्या यामिनी खामकर हिने जागतिक स्तरावर महाराष्ट्राची लोककला आणि कोकणच्या संस्कृतीचा झेंडा फडकवत अफाट यश संपादन केले आहे. ब्रिटन (UK) येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित ‘WOMAD Festival 2026’ मध्ये तिने आपल्या धडाकेबाज ढोल वादनाने जागतिक मंचावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
​जगभरातून आलेल्या नामांकित कलाकारांच्या आणि हजारो रसिक प्रेक्षकांच्या साक्षीने यामिनीसह तिच्या सहकारी कलाकारांनी ढोल वादनाची अशी काही दमदार सलामी दिली की, संपूर्ण सभागृहाने टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे कौतुक केले.
​जिद्द आणि मेहनतीचे यश
यामिनी खामकर हिची ही वाटचाल, तिची जिद्द आणि अथक मेहनत बोरसुत गावाला, संगमेश्वर तालुक्याला आणि संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटायला लावणारी आहे, अशा भावना बोरसुत ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.
​लहानपणाचा ध्यास आणि वडिलांची साथ
आपल्या या यशाबद्दल बोलताना यामिनी खामकर म्हणाली, “लहानपणापासून मला माझ्या बोरसुत या मूळ गावी जाण्याची खूप आवड होती. तेथील सण-उत्सवांमध्ये होणारी नाच-गाणी आणि विशेषतः ढोलाचा तो नाद माझ्या कानात लहानपणापासूनच घुमत होता. माझे वडील स्वतः ढोल वादनाची आवड जपणारे असल्याने मला त्यांची खंबीर साथ मिळाली. महाराष्ट्राची आणि विशेषतः कोकणातील होळीच्या पालखीसोबत वाजणाऱ्या ढोलाचा तो पारंपरिक आवाज सातासमुद्रापार नेऊन वाजवण्याचा मला मनापासून अतिशय आनंद होत आहे.”
​यामिनी खामकर हिच्या या उत्तुंग यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत असून पुढील भावी वाटचालीसाठी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
​

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!