उल्हासनगरमध्ये धक्कादायक घटना; आंतरजातीय प्रेमसंबंधांना विरोधातून आईकडून १९ वर्षीय मुलीची हत्या?
उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कॅम्प क्रमांक १ येथील भैय्यासाहेब आंबेडकर नगर परिसरात एका आईने आपल्या १९ वर्षीय मुलगी अमृता गरड हिची गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अमृताचे आंतरजातीय प्रेमसंबंध असल्याने घरात वाद सुरू होते. याच कारणातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, हत्येचे नेमके कारण आणि घटनेमागील सर्व परिस्थितीचा तपास पोलीस करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून संबंधित आईविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची आणि पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
या घटनेमुळे उल्हासनगर परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील सर्व तथ्य स्पष्ट होणार आहेत.
प्रतिनिधी सिंथिया कोरिया




