कोल्हापुरात माजी महिला सरपंचाची हत्या; मृतदेहाची विल्हेवाट लावताना प्रियकर अटकेत
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव येथे माजी महिला सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे (वय ५०) यांची गळा आवळून हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी त्यांचा प्रियकर प्रकाश उर्फ बाबू पाटील (वय ४०) याला पोलिसांनी अटक केली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सुरेखा न्यारे या आरोपीकडे वारंवार लग्नाचा आग्रह धरत होत्या. या तगाद्याला कंटाळून आरोपीने रविवारी (२६ जुलै) गोठ्यात त्यांची गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आहे.
हत्येनंतर आरोपीने मृतदेह कारच्या डिकीत ठेवून भिवंडीच्या दिशेने पलायन केले. कशेळी परिसरात पोहोचल्यानंतर त्याने आपल्या भाच्याला फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. भाच्याने तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर नारपोली पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण पुढील तपासासाठी शाहूवाडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले असून, आरोपीची चौकशी सुरू आहे. या हत्येमागील नेमके कारण आणि इतर बाबींचा तपास पोलीस करत आहेत.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी




