ढिसाळ नियोजनाचा फटका! बन्सल सिटी रोड बंद,


ढिसाळ नियोजनाचा फटका! बन्सल सिटी रोड बंद,

भोसरी–आळंदी–दिघी मार्गावर दोन तास वाहतूक ठप्प
भोसरी : दिघी येथील बन्सल सिटी रोडवर ड्रेनेज लाईनच्या कामासाठी रस्ता बंद करण्यात आल्याने त्याचा थेट परिणाम भोसरी–आळंदी रोड आणि दिघी रोडवरील वाहतुकीवर झाला. पर्यायी वाहतूक नियोजनाचा अभाव असल्याने वाहनचालकांना तब्बल दोन तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले.
सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी, रुग्णवाहिका तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना मोठा विलंब सहन करावा लागला. त्यातच पावसाची रिपरिप सुरू असल्याने दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांचे विशेष हाल झाले.
वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनचालकांची चिडचिड वाढल्याने अनेक ठिकाणी किरकोळ शाब्दिक वाद आणि भांडणांचे प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले. दीर्घकाळ वाहने जागेवरच उभी राहिल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.
रस्ता बंद करण्यापूर्वी पर्यायी मार्गांची प्रभावी व्यवस्था करणे आणि वाहतूक पोलिसांकडून योग्य नियोजन करणे आवश्यक होते. मात्र, वाहतूक नियंत्रणासाठी पुरेशी यंत्रणा दिसून आली नाही, अशी प्रतिक्रिया अनेक वाहनचालकांनी व्यक्त केली.
दीर्घकाळ वाहने रांगेत उभी राहिल्याने इंधनाची नासाडी झाली, तसेच वाहनांमधून निघणाऱ्या धुरामुळे परिसरातील वायुप्रदूषणात लक्षणीय वाढ झाली. नागरिकांनी भविष्यात अशा विकासकामांपूर्वी सक्षम वाहतूक आराखडा तयार करून पर्यायी मार्गांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली आहे.

प्रतिनिधी विजय अडसूळ


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!