‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताइतकेच कायदेशीर संरक्षण; राज्यसभेत महत्त्वाचे विधेयक मंजूर
नवी दिल्ली : राज्यसभेत ‘राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक (सुधारणा) विधेयक, २०२६’ आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. या विधेयकामुळे राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ याला राष्ट्रगीत ‘जन गण मन’ प्रमाणेच कायदेशीर संरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
विधेयकानुसार, ‘वंदे मातरम्’चा जाणीवपूर्वक अपमान करणे, त्याचा अनादर करणे किंवा त्याच्या सादरीकरणात अडथळा निर्माण करणे हा दंडनीय गुन्हा मानला जाईल. अशा प्रकारच्या कृत्यासाठी दोषी व्यक्तीला तीन वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
केंद्र सरकारने राष्ट्रीय सन्मानाशी संबंधित प्रतीकांचे संरक्षण अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने ही दुरुस्ती केली असल्याचे सांगितले आहे. याआधी राष्ट्रीय ध्वज आणि राष्ट्रगीताला कायदेशीर संरक्षण होते, तर आता त्याच कक्षेत ‘वंदे मातरम्’चाही समावेश करण्याचा प्रस्ताव या विधेयकाद्वारे करण्यात आला आहे.
राज्यसभेत हे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर झाले असून, पुढील घटनात्मक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच ते कायद्याच्या स्वरूपात लागू होणार आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429





