संसद परिसरातील नाट्यमय निदर्शनाप्रकरणी राहुल गांधी, पप्पू यादव यांच्यासह तिघांवर गुन्हा
नवी दिल्ली : संसद परिसरात राम मंदिर देणगीच्या कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर विरोधकांनी केलेल्या प्रतीकात्मक नाट्यमय निदर्शनानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी, अपक्ष खासदार पप्पू यादव आणि समाजवादी पक्षाचे खासदार अवधेश प्रसाद यांच्याविरुद्ध वाराणसी येथे एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
विरोधी खासदारांनी संसद परिसरात प्रतीकात्मक नाट्यप्रदर्शन करत राम मंदिराच्या देणगीतील कथित चोरीचा मुद्दा उपस्थित केला. या सादरीकरणात राहुल गांधी यांनी देणगी पेटीत पैसे टाकल्याचे, तर पप्पू यादव यांनी ते पैसे चोरल्याचे प्रतीकात्मक सादरीकरण केले. या कृतीमुळे सनातन धर्माच्या भावना दुखावल्याचा आरोप करत वाराणसीतील काही संत-महंत आणि तक्रारदारांनी पोलिसांकडे धाव घेतली.
तक्रारीच्या आधारे वाराणसी पोलिसांनी संबंधित खासदारांविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, दिल्लीतही भाजप नेत्यांनी या प्रकरणी स्वतंत्र पोलिस तक्रार दाखल केली असून, संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. मात्र, दिल्लीत अद्याप एफआयआर नोंद झाल्याची अधिकृत माहिती उपलब्ध नाही.
या घटनेमुळे संसदेतील विरोधकांचे आंदोलन आणि त्यावरील राजकीय वाद अधिक तीव्र झाला असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429








