करजगी बालिकेवर अत्याचार व खून प्रकरण : नराधम पांडुरंग कळ्ळीला फाशीची ऐतिहासिक शिक्षा;सांगली सत्र न्यायालयाचा निकाल


करजगी बालिकेवर अत्याचार व खून प्रकरण : नराधम पांडुरंग कळ्ळीला फाशीची ऐतिहासिक शिक्षा;सांगली सत्र न्यायालयाचा निकाल

सांगली : जत तालुक्यातील करजगी येथील केवळ ४ वर्षे २ महिने वयाच्या चिमुरडीवर अत्यंत पाशवी अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या पांडुरंग सोमन्ना कळ्ळी (वय ४५, रा. करजगी, ता. जत) या नराधमाला सांगलीच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती जे. ए. मोहंती यांनी शनिवार, १ ऑगस्ट २०२६ रोजी मरेपर्यंत फाशीची ऐतिहासिक शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने या गुन्ह्याचे स्वरूप ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ (Rarest of Rare) असल्याचे स्पष्ट करत आरोपीला कोणत्याही प्रकारची दया दाखवण्यास नकार दिला.

सरकारी पक्षाने मांडलेल्या पुराव्यानुसार, ही काळीज पिळवटून टाकणारी घटना ६ फेब्रुवारी २०२५ रोजी घडली होती. पीडित चिमुरडी घराबाहेर खेळत असताना आरोपी पांडुरंग कळ्ळी याने तिला बदामाच्या झाडाजवळून आपल्या पत्र्याच्या घरात नेले. तिथे तिच्यावर क्रूर लैंगिक अत्याचार करण्यात आला. अत्याचाराच्या वेदनेमुळे चिमुरडीचा ‘हेमोरेजिक शॉक’ (अति रक्तस्त्रावामुळे बसलेला धक्का) मुळे मृत्यू झाला. गुन्हा लपवण्यासाठी नराधमाने तिचा मृतदेह एका पांढऱ्या पोत्यात भरून, ते पोते घरातील लोखंडी पेटीत (ट्रंकमध्ये) लपवून ठेवले होते.चिमुरडी बेपत्ता झाल्यानंतर उमदी पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली. संशयावरून आरोपीच्या घराची झडती घेतली असता, रक्ताने माखलेल्या चटईवर ठेवलेल्या पेटीतून तिचा मृतदेह जप्त करण्यात आला. तत्कालीन तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) सुनील सदाशिव साळुंखे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) संदीप कांबळे यांनी अत्यंत गतीने तपास चक्र फिरवून अवघ्या १३ ते १५ दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

या खटल्यात सरकारी वकील अ‍ॅड. प्रमोद ए. भोकरे (D.G.P.) यांनी एकूण १५ साक्षीदार तपासले. यामध्ये चिमुरडीची आजी (फिर्यादी), तिची चुलत बहीण (जिने शेवटचे जिवंत पाहिले) आणि महत्त्वाची वैद्यकीय साक्ष देणारे मिरज सिव्हिल हॉस्पिटलचे डॉ. जिन्सी व्ही. एल. यांच्या साक्षी अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या. कोल्हापूरच्या प्रादेशिक फॉरेन्सिक लॅबोरेटरीच्या सहाय्यक रासायनिक विश्लेषक प्रतिभा माळी यांनी सादर केलेला डीएनए (DNA) अहवाल हा या खटल्यातील सर्वात मोठा आणि भक्कम वैज्ञानिक पुरावा ठरला. आरोपीच्या कपड्यांवरील आणि घटनास्थळावरील रक्ताचे डाग पीडितेच्या डीएनए प्रोफाइलशी तंतोतंत जुळले, ज्यामुळे आरोपीचा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला.

न्यायालयाने सुनावलेली शिक्षा न्यायाधीश श्रीमती जे. ए. मोहंती यांनी सर्व पुरावे आणि कलमे ग्राह्य धरून आरोपीला खालीलप्रमाणे विविध कलमांखाली दोषी ठरवून शिक्षा सुनावली १. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) (खून) आणि कलम ६५(२) (१२ वर्षांखालील मुलीवर बलात्कार) दोन्ही कलमांखाली स्वतंत्रपणे मरेपर्यंत फाशी आणि एकूण २० हजार रुपये दंड.२. BNS कलम २३८ (गुन्ह्याचा पुरावा नष्ट करणे) ७ वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंड.३. BNS कलम १२७(२) (बेकायदेशीर डांबून ठेवणे) १ वर्ष सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंड.४. पोक्सो कायदा (POCSO) कलम ४, ६ व ८ नैसर्गिक आयुष्य संपेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा.पीडित कुटुंबाला नुकसानभरपाई न्यायालयाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली यांना पीडित चिमुरडीच्या पालकांना योग्य आणि भरीव आर्थिक नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत. या निकालामुळे संपूर्ण सांगली जिल्हा आणि करजगी परिसरातून समाधान व्यक्त होत असून, चिमुरडीला अखेर दीड वर्षात न्याय मिळाला आहे.

वार्ताहर : संजय कोळी. वळसंग/जत.
मोबाईल ७८७५९०३७७७.


45
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!