कोकण विकसित होताना: जमिनीचे वाद, वास्तव आणि समृद्धीचा मार्ग
- भालचंद्र माने (नेरूळ, नवी मुंबई)
कोकणातील अनेक जमिनी वडिलोपार्जित आहेत. विशेष करून कोकणातील बहुतेक लोक नोकरी निमित्त, व्यवसाया करिता, मुलांच्या शिक्षणासाठी , उज्वल भविष्यासाठी बाहेरगावी गेले. त्यांचे आपल्या गावाकडील जमिनीकडे विशेष करून दुर्लक्ष झाले.
कोकणातील बहुतेक जागा या सुपीक आणि सुंदर असून सुद्धा त्याचा व्हायला पाहिजे इतका विकास झाला नाही. त्याला अनेक कारणे असू शकतील. विशेष म्हणजे जो गावी राहील आणि राखेल त्याची जागा समजायला लागला.
सातबारा वरती अनेक नावे असल्यामुळे ज्यांना कोणाला आपल्या जमिनीचा विकास उदा. झाडे लावण्यासाठी किंवा घर बांधण्याचे, असेल तरी सुद्धा हे सोपे होत नाही .
जमीन स्वतंत्ररित्या नावावर नसल्याकारणाने त्याला कोणतेही जमिनी संबंधी काम करताना अनेक अडथळे येतात.
कुटुंबप्रमुखांची जबाबदारी वेळच्यावेळी आपल्या वारसदारांची नावे नोंद करून घेणे आणि आपल्या वारसदारांमध्ये वाटप करणे ही जबाबदारी समजली पाहिजे.
कोकणातील जमीनी ह्या पिढ्यानपिढ्या दुर्लक्षित राहण्याचे विशेष कारण म्हणजे स्वतः कोकणी माणूसच आहे. कोकणातील जमिनी वरती जमीन मालकांनी फक्त वारस तपास करून आपले नावे लावून उपयोग नाही . त्याचे वाटप करून कोकणाचा विकास कसा करता येईल आणि आपल्या माणसाचा विकास कसा होईल याचा सकारात्मक विचार झाला पाहिजे.
आम्ही गाव वाचवला असे गावात राहणारे म्हणतात आणि अधिकार सांगतात. ते कितपत खरे आहे.
गावात राहणाऱ्यांना कष्ट त्रास झाले होतात तसेच शहरात कामधंदा निमित्त सुद्धा कष्ट आणि त्रास आहेच.
गाव सोडून शहरात गेलेले सुद्धा आपापल्या परीने आपल्या गावातील लोकांकरता ,शाळेकरिता, समाजा करता त्यांच्या परीने सहकार्य मदत करत असतात.
नाण्याच्या दोन्ही बाजू तपासून पाहिल्या पाहिजेत. जमिनीच्या वादातून नाती तुटतात परंतु वेळीच कुटुंबप्रमुखांनी याची काळजी घेतली आणि व्यवस्थित न्याय निवाडा केला तर कोकणाचा विकास आणि कोकणी माणसाचा विकास नक्कीच होईल.
भावकीतले हेवेदावे,वाद, द्वेष ,मत्सर , धुसफूस,इर्षा ,भांडण तंटा होणार नाही.
जगात सर्वचजण चांगले असतात असे नाही .तसेच गावात, वाडीत,भावकीत चांगले तसे वाईट लोक सुद्धा असतात .काही लोकांची वाईट प्रवृत्ती असते . माचीसची काडी टाकून आग लावणे आणि मजा घेणे. समाजविघातक काड्या करून आसुरी आनंद घेतात .
वडिलोपार्जित जमीन भावनिक , संवेदनशील व ही खूप महत्त्वाची आहे. तिला सांभाळली पाहिजे. आपल्या वडिलोपार्जित जमिनीचा व्यवस्थित सामोपचाराने समजुतीने सर्वांनी निर्णय घेतला पाहिजे.
ओसाड जमिनी ठेवून आपल्या पूर्वजांना सुद्धा काय वाटत असेल. त्याचा सुद्धा विचार करणे गरजेचे आहे. कोणत्या बापाला आवडेल आपली मुले आपसांत भांडण,द्वेष करत आहेत.
कोकणचा विकास व कोकणी माणसांचा विकासासाठी लोकप्रतिनिधी , ज्येष्ठ ग्रामस्थ , ग्रामस्थ , कुटुंब प्रमुख यांनी पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे.
स्वतंत्र सातबारा करण्यासाठी सरकारकडे सुटसुटीत कायदा करण्याकरिता लोकप्रतिनिधींसह सर्वांनी पाठपुरावा केला पाहिजे.
आज परप्रांतीय कोकणी माणसाच्या नाकर्तेपणाचा फायदा घेत आहे. परप्रांतीय कष्टाने ,चिकाटी,हिम्मत, धाडस , संघटन करून राहतात व आपल्या माणसांना सहकार्य करीत सुख समृद्ध करत आहे. कोकणी माणसांनी असे चांगले गुण घेण्यासारखे आहेत. कोकण विकसित होताना समृद्ध विचार झाला पाहिजे.
भालचंद्र माने. नेरूळ, नवी मुंबई.








