ताथवड्यातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलवर गुन्हा; सुरक्षा रक्षकाच्या मृत्यूप्रकरणी निष्काळजीपणाचा आरोप.


ताथवड्यातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलवर गुन्हा; सुरक्षा रक्षकाच्या मृत्यूप्रकरणी निष्काळजीपणाचा आरोप

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी – ताथवडे, दि. ७ ऑगस्ट २०२६ : ताथवडे येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये मुख्य प्रवेशद्वार अंगावर कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी शाळेचे प्राचार्य, शाळा प्रशासन तसेच गेटच्या देखभालीस व सुरक्षिततेस जबाबदार संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ८.१० वाजता शाळेचे सुरक्षा रक्षक संजय नागनाथ कांबळे हे मुख्य प्रवेशद्वार उघडत होते. त्यावेळी लोखंडी गेट अचानक त्यांच्या अंगावर कोसळले. या दुर्घटनेत कांबळे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना २ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान वैद्यकीय कागदपत्रे, एमएलसी, पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, घटनास्थळाची पाहणी तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या तपासातून प्रथमदर्शनी शाळेचे मुख्य प्रवेशद्वार सुरक्षित स्थितीत नसल्याचे आढळून आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

गेटची आवश्यक दुरुस्ती व मजबुतीकरण, नियमित तपासणी तसेच प्रतिबंधात्मक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने ही दुर्घटना घडल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

या प्रकरणी शाळेचे प्राचार्य, शाळा प्रशासन आणि गेटच्या देखभाल व सुरक्षिततेस जबाबदार संबंधित व्यक्तींविरुद्ध निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

प्रतिनिधी :  शाम शिरसाठ,पुणे


44
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!