डुप्लिकेट चावी न फिरल्याने मुंबईत व्यापारी कुटुंबाच्या हत्येचा कट फसला;
मुंबई : मुंबईतील जुहू परिसरात एका व्यापारी कुटुंबाची हत्या करून दरोडा टाकण्याचा तब्बल दोन ते तीन वर्षांपासून सुरू असलेला कथित कट अखेर फसला. फ्लॅटचे कुलूप उघडण्यासाठी तयार केलेली डुप्लिकेट चावी न फिरल्याने आरोपींना आपला डाव अर्धवट सोडून पळ काढावा लागला.
या प्रकरणाचा तपास करताना जुहू पोलिसांसमोर धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींनी इमारतीतील वॉचमनची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकल्याचे तपासात समोर आल्याचे वृत्त आहे.
वॉचमनच्या हत्येनंतर व्यापाऱ्याच्या फ्लॅटकडे मोर्चा
वॉचमनची हत्या केल्यानंतर आरोपी व्यापाऱ्याच्या फ्लॅटमध्ये प्रवेश करण्यासाठी गेले. मात्र, त्यांनी तयार केलेली डुप्लिकेट चावी कुलूपात फिरली नाही. त्यामुळे फ्लॅटमध्ये प्रवेश करता न आल्याने त्यांचा दरोडा आणि हत्या करण्याचा कट फसला.
स्वयंपाकी मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप
पोलिसांच्या तपासात व्यापाऱ्याचा स्वयंपाकी जोगेश्वर मल्लिक हा या कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. जुहू पोलिसांनी मल्लिकसह एकूण पाच आरोपींना अटक केली आहे.
पुनर्विकासामुळे इमारतीत केवळ तीन कुटुंबे
संबंधित इमारतीत सध्या पुनर्विकासाचे काम सुरू असल्याने तेथे केवळ तीन कुटुंबे राहत होती. त्यामुळे व्यापारी कुटुंबाला लक्ष्य करण्याचा कट आरोपींनी आखल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास जुहू पोलिसांकडून सुरू असून, कटामागील नेमके कारण, आरोपींना व्यापारी कुटुंबाची माहिती कशी मिळाली आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास केला जात आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429






