मराठी न येणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाई; परवाने रद्द करण्याचा इशारा


मराठी न येणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाई; परवाने रद्द करण्याचा इशारा

मुंबई : राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक करण्यात आले आहे. मराठीचे ज्ञान नसलेल्या किंवा मराठी शिकण्यास टाळाटाळ करणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. विशेष कारवाईला २० ऑगस्टपासून सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
परिवहन विभागाच्या नियमानुसार, मराठीचे आवश्यक ज्ञान नसलेल्या चालकांना सुरुवातीला एक महिन्याची मुदत देण्यात येणार आहे. या कालावधीत त्यांनी मराठी भाषा शिकली नाही, तर त्यांचा वाहनचालक परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाऊ शकतो. त्यानंतरही नियमांचे पालन न केल्यास परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
नवीन रिक्षा-टॅक्सी चालकांना परवाना आणि बॅज देताना RTO कडून त्यांच्या व्यावहारिक मराठी भाषेची तपासणी केली जाणार आहे. या तपासणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, RTOच्या वायुवेग पथकांकडूनही तपासणी मोहीम राबवण्यात येणार असून, आवश्यक प्रमाणपत्र नसलेल्या तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाणार आहे.
प्रवाशांशी संवाद साधताना चालकांना दैनंदिन व्यवहारातील मराठी समजणे आणि बोलता येणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे परिवहन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!