सुट्टे खाद्यतेल विक्रीवरील बंदीला व्यापाऱ्यांचा विरोध; नाशिकमध्ये राज्यव्यापी बैठक, न्यायालयात जाण्याचा इशारा


सुट्टे खाद्यतेल विक्रीवरील बंदीला व्यापाऱ्यांचा विरोध; नाशिकमध्ये राज्यव्यापी बैठक, न्यायालयात जाण्याचा इशारा

नाशिक : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुट्टे खाद्यतेल विक्री तसेच खरेदीवर बंदी घालण्याचे आदेश दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील खाद्यतेल व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या निर्णयाच्या विरोधात नाशिकमध्ये राज्यातील खाद्यतेल व्यापाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
सुट्टे खाद्यतेल विक्री बंद करण्याच्या निर्णयामुळे व्यापाऱ्यांसमोर मोठ्या अडचणी निर्माण होणार असल्याचा दावा बैठकीत करण्यात आला. शासनाने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, शासनाकडून या निर्णयाबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे. यासाठी राज्य सरकारला १५ दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
बैठकीदरम्यान व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “आम्ही अतिरेकी आहोत का?” असा संतप्त सवाल उपस्थित करत व्यापाऱ्यांनी आपल्या व्यवसायावर अशा प्रकारे निर्बंध लादण्यास विरोध दर्शविला.
सुट्टे खाद्यतेल विक्रीवर बंदी घालण्यामागे प्रशासनाकडून खाद्यपदार्थांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित कारणे दिली जात असली, तरी या निर्णयाचा थेट परिणाम खाद्यतेल व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर होणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
आता पुढील १५ दिवसांत शासनाकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे राज्यातील खाद्यतेल व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे. निर्णय मागे न घेतल्यास न्यायालयीन लढाई उभारण्याची भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!