चाकण एमआयडीसीतील वाहतूक कोंडीवर उपाययोजना; प्रीकास्ट ब्लॉक तंत्रज्ञानाने रस्ते बांधणीला वेग
चाकण : चाकण एमआयडीसी परिसरातील खराब रस्ते आणि दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाकणचा दौरा करून रस्ते कामांची पाहणी केली.
चाकण-तळेगाव रोडवरील रस्त्यांची कामे कमी वेळेत आणि जलदगतीने पूर्ण करण्यासाठी ‘प्रीकास्ट ब्लॉक’ अर्थात रेडीमेड रस्ते तंत्रज्ञानाचा प्रयोग करण्यात येत आहे. या तंत्रज्ञानामुळे पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत रस्त्यांची कामे अधिक वेगाने पूर्ण करता येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
या प्रकल्पाची पाहणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. यावेळी संबंधित अधिकारी आणि विभागाच्या प्रतिनिधींकडून रस्ते बांधणीच्या कामाची माहिती घेण्यात आली.
चाकण एमआयडीसी हा राज्यातील महत्त्वाचा औद्योगिक परिसर असून येथे मोठ्या प्रमाणावर वाहनांची तसेच अवजड वाहतूक असते. मात्र, रस्त्यांची दुरावस्था आणि सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे उद्योगांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, रस्त्यांची खराब अवस्था आणि वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे सुमारे २० लघुउद्योग स्थलांतर करण्याच्या विचारात असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी उद्योग क्षेत्रातून होत होती.
प्रीकास्ट ब्लॉक तंत्रज्ञानामुळे रस्ते बांधणीचा कालावधी कमी होऊन वाहतूक सुरळीत करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या तंत्रज्ञानाचा प्रयोग यशस्वी ठरल्यास चाकण एमआयडीसीतील इतर रस्त्यांच्या कामांसाठीही त्याचा वापर करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
चाकणच्या औद्योगिक विकासासाठी रस्ते, वाहतूक आणि पायाभूत सुविधांचा प्रश्न महत्त्वाचा असल्याने शासनाच्या या उपाययोजनांकडे उद्योगविश्वाचे लक्ष लागले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429








