वसतिगृहातील विषबाधा प्रकरणावरून ‘आप’ आक्रमक
प्रशासनाचा अहवाल संशयास्पद असल्याचा आरोप; उद्यापासून SDO कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा
भोकरदन, प्रतिनिधी/ महेंद्र बेराड दि. २४ : शासकीय मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या कथित विषबाधा प्रकरणावरून आम आदमी पार्टीने आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रशासनाकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप करत, मागण्या मान्य करून लेखी आदेश न दिल्यास दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता भोकरदन उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
शासकीय मुलींच्या वसतिगृहातील चार ते पाच विद्यार्थिनींची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा दावा आम आदमी पार्टीने केला आहे. या घटनेनंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी समाजकल्याण विभागाला पत्र देऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, समाजकल्याण विभागाच्या अहवालात विषबाधा झाल्याचे नाकारण्यात आले असून, भाजीमध्ये तिखट जास्त झाल्याने विद्यार्थिनींची प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात आल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे.
दरम्यान, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मुलांच्या व मुलींच्या वसतिगृहातील स्वयंपाकघर व भोजन व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केल्याचे सांगितले. यावेळी मुदत संपलेले पीठ, खराब व कुजलेला भाजीपाला, बुरशी लागलेले साहित्य तसेच अस्वच्छता आढळल्याचा दावा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर प्रकार असून याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे पक्षाने म्हटले आहे.
‘आप’च्या प्रमुख मागण्या
वसतिगृहातील मेसचा ठेका तातडीने रद्द करावा, संबंधित D.M.K. Enterprises JV With Solution Pvt. Ltd. कंपनीला शासकीय कामातून काळ्या यादीत टाकावे, दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, बाधित विद्यार्थिनींना शासकीय उपचारासह प्रत्येकी ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, तसेच अन्नधान्य व शिल्लक अन्नाचे नमुने FSSAI मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासावेत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
याशिवाय निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी, वसतिगृहात CCTV, बायोमेट्रिक प्रणाली आणि तक्रारपेटीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाने मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन लेखी आदेश न दिल्यास २५ ऑगस्टपासून आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा आम आदमी पार्टीचे जिल्हा सचिव बोरसे गुरुजी, जिल्हा उपाध्यक्ष महजादखान, शहर उपाध्यक्ष फारुक भाई, भगवान पालकर, इब्राहिम कुरेशी, नारायण सोन्नी व वैशाली दाभाडे यांनी दिला आहे.





