दुष्काळसदृश परिस्थितीबाबत मदतीचा आदेश उद्याच काढणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
वाशिम : वाशिम जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पाहणी केली. कारंजा तालुक्यातील म्हसला, मंगरुळपीर तालुक्यातील मोहगव्हाण आणि मालेगाव तालुक्यातील जऊळका येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला.
म्हसला येथील शेतकरी देविदास काळे, मोहगव्हाण येथील अनिल भगरे व अब्दुल नईम शेख रहीम तसेच जऊळका येथील शेतकरी संतोष डुंबळे यांच्या शेतात जाऊन मुख्यमंत्र्यांनी परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी संतोष डुंबळे यांच्या आई शकुंतलाबाई डुंबळे यांनी नुकसानीची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांना दिली.
अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांना अवर्षणाची झळ पोहोचली असून सोयाबीन, तूर यासह विविध पिके संकटात आली आहेत. या पार्श्वभूमीवर दुष्काळ संहितेतील ट्रिगर-१नुसार मदतीचा आदेश उद्याच काढण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
केंद्र सरकारच्या मदतीची प्रतीक्षा न करता राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाईल. केंद्राच्या मदतीसाठी आवश्यक पंचनामे व इतर प्रक्रिया पूर्ण करून प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मदतीतून काही भाग वगळला गेला असल्यास पुढील प्रक्रियेत त्याचा समावेश करण्याबाबत कार्यवाही केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
येत्या काळातील चाराटंचाई आणि पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. गरजू कुटुंबांना अन्नधान्याची मदत देण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी थेट मदतीचे नियोजन करण्यात येणार आहे.
रब्बी हंगामासाठी ज्या भागात पाणी उपलब्ध आहे, त्या ठिकाणी पिके घेण्याची शक्यता तपासून शेतकऱ्यांना आवश्यक मदत दिली जाईल. रोजगारनिर्मितीसाठी जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्यात येणार असून, आटलेल्या जलसाठ्यांमधील गाळ काढणे, जलतारा स्ट्रक्चर उभारणे तसेच दुरुस्ती आवश्यक असलेल्या तलावांची कामे हाती घेतली जाणार आहेत.
सर्वदूर पिकांची परिस्थिती गंभीर असल्याने राज्य सरकारने मदतीचे धोरण आखले असून, ही मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे नियोजन केले जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
राज्य सरकारने केलेल्या कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असून, कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना बँकांनी नियमानुसार कर्जपुरवठा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शेतमालाची शासकीय दराने खरेदी करण्यात येणार असून, त्यासाठी लवकरच नोंदणी सुरू केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी खासदार संजय देशमुख, खासदार अनुप धोत्रे, आमदार बाबूसिंह महाराज राठोड, आमदार सई डहाके, आमदार राजेश बकाने, आमदार श्याम खोडे, आमदार रणधीर सावरकर, आमदार भावना गवळी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी






