SIR प्रक्रियेत मोठा बदल; नोटीस मिळालेल्या मतदारांच्या घरी आता BLO पोहोचणार
मुंबई : महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) प्रक्रियेत भारत निवडणूक आयोगाने महत्त्वाचा बदल केला आहे. SIR प्रक्रियेदरम्यान ज्यांना नाव मॅप न झाल्यामुळे किंवा तार्किक विसंगती आढळल्यामुळे नोटीस बजावण्यात आली आहे, अशा मतदारांच्या घरी आता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) भेट देणार आहेत. BLO संबंधित मतदारांकडून आवश्यक कागदपत्रे स्वीकारून ती ECINet प्रणालीवर अपलोड करणार आहेत. त्यामुळे अशा मतदारांना कागदपत्रे सादर करण्यासाठी निवडणूक अधिकारी किंवा सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही.
नोटीस मिळालेल्या प्रत्येक मतदाराची प्रत्यक्ष कार्यालयात सुनावणी घेणे आवश्यक राहणार नाही. केवळ अपवादात्मक परिस्थितीतच सुनावणी घेण्यात येईल आणि ती शक्यतो ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. आवश्यक असल्यास संबंधित मतदाराच्या कुटुंबातील कोणत्याही प्रौढ सदस्याला त्याच्या वतीने सुनावणीस उपस्थित राहता येणार आहे. ऑनलाइन सुनावणीची सुविधा अधिक सक्षम करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
दरम्यान, रात्रनिवारा केंद्रांमध्ये राहणारे नागरिक, मजूर, गरीब आणि बेघर नागरिक यांना SIR प्रक्रियेत आवश्यक मदत मिळावी यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून विशेष हेल्प डेस्क आणि शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.
महाराष्ट्रातील SIR संदर्भातील सूचना, कागदपत्रांची माहिती, जिल्हानिहाय हेल्प डेस्क तसेच इतर आवश्यक माहिती मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. SIR संदर्भातील चौकशीसाठी 1950 या हेल्पलाइन क्रमांकाचाही वापर करता येणार आहे.
आयोगाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात दावे व हरकती दाखल करण्याची मुदत 12 ऑक्टोबर 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे, तर नोटिसा आणि दावे-हरकती निकाली काढण्याची मुदत 10 नोव्हेंबर 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी








