बारी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासनाला जाब विचारण्याचा निर्धार


बारी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासनाला जाब विचारण्याचा निर्धार

संत रुपलाल महाराज स्मारक, आर्थिक विकास मंडळ व समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी ठोस कृतीचा बैठकीत निर्णय

छत्रपती संभाजीनगर, दि. २७ सप्टेंबर २०२६ प्रतिनिधी/ महेंद्र बेराड:
अखिल भारतीय बारी समाज महासंघाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल गुरुप्रसाद, एसबीओ शाळेसमोर, मयूर पार्क रोड, हर्सूल येथे बारी समाजाची एकदिवसीय राज्यस्तरीय विशेष निर्णायक बैठक उत्साहात पार पडली. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत संत रुपलाल महाराज राष्ट्रीय स्मारक, अंजनगाव सुर्जी, संत रुपलाल महाराज आर्थिक विकास मंडळ, बारी समाजाची आर्थिक उन्नती तसेच बारी उद्योजक मेळावा या प्रमुख विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यासोबतच आवश्यकता भासल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

संत रुपलाल महाराज राष्ट्रीय स्मारकाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

संत रुपलाल महाराज राष्ट्रीय स्मारकासाठी शासनाने मंजूर केलेला निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा आणि दिवाळीपूर्वी स्मारकाचे भूमिपूजन करण्यात यावे, अशी ठाम मागणी बैठकीत करण्यात आली.

स्मारकासाठी नियोजित जागेवर बांधकाम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असल्यास, रस्त्यालगत योग्य, प्रशस्त व सुविधायुक्त पर्यायी जागा उपलब्ध करून घेऊन तेथे भव्य स्मारक उभारण्याचा पर्याय शासनाने विचारात घ्यावा, अशी भूमिकाही मांडण्यात आली.

हे स्मारक केवळ धार्मिक स्थळ न राहता संत रुपलाल महाराज यांच्या कार्याची प्रेरणा देणारे सामाजिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक प्रेरणास्थळ म्हणून विकसित करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच स्मारकाचा कारभार कोणत्याही एका व्यक्ती किंवा मर्यादित संस्थेकडे न देता सर्वसमावेशक आणि बारी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थेकडे सोपविण्याची मागणी शासनाकडे करण्याचे ठरविण्यात आले.

आर्थिक विकास मंडळ तातडीने कार्यान्वित करण्याचा आग्रह

बारी समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी घोषित करण्यात आलेले संत रुपलाल महाराज आर्थिक विकास मंडळ तातडीने कार्यान्वित करण्यात यावे, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.

मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळामध्ये बारी समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी शासनाकडे ठोस पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. समाजातील युवक, महिला, उद्योजक तसेच आर्थिकदृष्ट्या गरजू घटकांना योजनांचा प्रभावी लाभ मिळावा, यासाठी संबंधित संस्थात्मक रचना अधिक सक्षम व स्वतंत्र करण्याबाबतही चर्चा झाली.

मागण्या पूर्ण न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन

बारी समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर शासनाने गांभीर्याने विचार करून कालबद्ध पद्धतीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली. यासाठी निवेदने, शासनस्तरीय बैठका आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यासोबतच आवश्यकता भासल्यास मोर्चा, उपोषण यांसारख्या लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याची तयारी बैठकीत व्यक्त करण्यात आली.

बारी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची घोषणा

बारी समाजाच्या आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी ‘बारी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ (BCCI) स्थापन करण्यात आल्याची घोषणा बैठकीत करण्यात आली.

या माध्यमातून समाजातील उद्योजकांना एकत्र आणणे, नवउद्योजकांना मार्गदर्शन व सहकार्य करणे, उद्योग-व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे, रोजगारनिर्मितीला चालना देणे आणि युवकांना उद्योग क्षेत्राकडे वळविण्यासाठी प्रयत्न करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. तसेच समाजातील उद्योजकांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम समाजनिर्मितीसाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत चर्चा झाली.

समाजाच्या एकजुटीवर भर

संत रुपलाल महाराज स्मारक, आर्थिक विकास मंडळ आणि समाजाच्या आर्थिक प्रगतीशी संबंधित मागण्या या बारी समाजाच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या असल्याने सर्व जिल्हे व तालुक्यांतील समाजबांधवांनी संघटितपणे पुढील कार्यवाहीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

बैठकीतील उपस्थितांनी समाजाच्या विविध मागण्यांसाठी एकजुटीने, संघटितपणे आणि सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.

“एकजूट,विचार,कृती , विकास” या भूमिकेतून बारी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील काळात व्यापक पातळीवर काम करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

प्रमुख उपस्थिती

बैठकीस अखिल भारतीय बारी समाज महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष रमेशचंद्र घोलप, राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य,बारी समाज विकास संस्थेचे सदस्य, महाराष्ट्रातील विविध प्रदेश कमिटीचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष, तालुकाध्यक्ष तसेच विविध जिल्ह्यांतील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!