दुष्काळी परिस्थितीत कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही; यादीबाहेरील तालुक्यांचीही तपासणी
मुंबई : राज्यात अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मात्र, या यादीत समावेश न झालेल्या तालुक्यांचीही तपासणी करण्यात येणार असून, निकषांची पूर्तता करणाऱ्या तालुक्यांचा ट्रिगर-३ अंतर्गत मदतीसाठी समावेश केला जाईल. दुष्काळी परिस्थितीत कोणताही नागरिक किंवा शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
पर्जन्यमानातील तूट आणि अन्य निकषांच्या आधारे प्रभावित २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली असून, तेथे १२ उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना विहित कार्यपद्धतीनुसार शेतपिकांच्या नुकसानीची मदत दिली जाणार आहे.
यादीत समावेश न झालेल्या सर्व तालुक्यांची तपासणी करून आवश्यकतेनुसार ट्रिगर-३ अंतर्गत मदत देण्याची कार्यवाही केली जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून, त्यानुसार पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे. राज्यातील बहुतांश जलप्रकल्पांमध्ये सध्या पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असून, जुलै-ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचे आरक्षण कायम ठेवून अतिरिक्त उपलब्ध पाणी रब्बी हंगामासाठी देता येईल का, याचाही विचार केला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अल निनोच्या परिस्थितीचाही अभ्यास
अल निनोमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा अभ्यास करून त्यानुसार उपाययोजना करण्यात येणार आहेत. फेब्रुवारीअखेरपर्यंत परिस्थितीचा उच्चांक गाठण्याची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना प्राधान्याने पूर्ण करण्याच्या दृष्टीने निर्णय घेतले जात असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासनाच्या प्रयत्नांसोबतच नागरिकांनीही सहकार्य करावे. अनावश्यक खर्च टाळून दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना शक्य ती मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले
दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे छत्तीसगडमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत शासनाकडून आवश्यक ती संपूर्ण मदत दिली जात असून, स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. पूरस्थिती आता निवळत असून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी








